Wednesday, October 19, 2011

मेळघाटनामा

एका सामान्य पांढरपेशा मध्यमवर्गीय कुटुंबातुन आल्यामुळे समाजसेवा करण्याचा विचार माझ्या डोक्यात बरेच वर्षापासून आहेजून महिन्यात १५ दिवसांची एक गिर्यारोहणाची मोहीम आखली होती पण अचानक काम निघाल्यामुळे त्यावर पाणी फिरले. २ महिन्यानंतर १५ दिवस सुट्टी घ्यायचा विचार चालू असताना मेळघाट मित्रची बातमी वर्तमानपत्रात वाचनात आली. मैत्री संस्था मेळघाट मधल्या कुपोषणाच्या समस्येवर काम करते. हे वाचल्यावर काय करायचा ते ठरला आणि मी संस्थेच्या फोनवर संपर्क साधला आणि धडक मोहिमेत सहभागी होण्यासाठी काय करावा लागेल याची चौकशी केली. मैत्रीच्या वेबसाईटवरून ६ सप्टेंबर – १५ सप्टेंबरच्या बॅचसाठी सहभाग नोंदवला.
परंतु एवढ्या दुर्गम भागात जाऊन हे काम करणे जमेल का नाही अशी थोडी शंका होती.
शेवटी तो दिवस आला आणि मी अकोल्याला जाण्यासाठी पुणे - नागपूर रेल्वे पकडली.
६ तारखेला सकाळी ५ च्या सुमारास अकोला गाठलं. पुढचा प्रवास दुसरया गाडीने होणार होता. अकोला जंक्शनच्या ७व्या फलाटावर रतलाम एक्सप्रेस थांबते. सकाळी ५ वाजता प्लॅटफॉर्मवर कोणी नसल्यामुळे कुठे आलोय असा झाला होता. ६ वाजता गाडी हलली. नॅरोगेज लाईन असल्यामुळे १०० किमी अंतरावरचा डाबका स्टेशन गाठायला १० वाजले. प्रवास जंगलातून असल्यामुळे निसर्गसौंदर्य अनुभवता आले. सोबतच परभणीवरुन आलेली काही मंडळी अजमेर शरीफला चालली होती. त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत प्रवास कधी संपला ते समजलच नाही. आता बेस कॅंप, धारणी पर्यंत जाणे हा शेवटचा टप्पा होता. डाबक्यावरून धारणी साधारण ३५ किमी आहे. जाताना एका जीपमधून जास्तीत जास्त किती लोक जाऊ शकतात याचा अनुभव आला. एका वेळेस जीपमध्ये कमीत कमी २५ जण तरी असावेत. त्यात मला बॅग गाडीच्या छतावर टाकावी लागली. कारण चालकाने एवढी मोठी बॅग घेऊन गाडीत बसून नेण्यास नकार दिला.
असा एक एक नवीन अनुभव घेत आणि धक्के पाचवत मी धारणीला पोहोचलो. जीपमध्ये सोबतच असलेल्या एका शिक्षकांनी मैत्रीच्या बेस कॅम्पच्या ठिकाणाचा पत्ता सांगितला. १० मि पायपीट केल्यानंतर मी कॅम्पवर पोहोचलो. तिथे मैत्रीचे कार्यकर्ते रामभाऊंना भेटलो. आमच्या बॅचसाठी येणाऱ्यांपैकी मी पहिलाच होतो. थोड्या वेळाने त्यांनी मला तिथल्या कामाची थोडीफार ओळख करून दिली आणि साधारण कुठे जावा लागेल याची कल्पना दिली. गणपती उत्सव चालू असल्यामुळे स्वयंसेवकांची संख्या कमी होती. दुपारी एका भोजनालयात जेवण झाले. काही वेळाने आणखी ४ जण आले. आमची २ गटात विभागणी करून आम्हाला खारी आणि हिराबंबई या ठिकाणी पाठवायचा ठरला. आमच्यातल्या तिघांना हिराबंबईला पाठवण्यात आला. धारणी पासून हे ठिकाण ३९ किमी अंतरावर आहे. आमच्या अगोदरच्या हिराबंबईच्या बॅचमध्ये १० जण होते. त्यांच्यातले सगळेजण त्यांचा काम आम्हाला समजवणार होते आणि आम्ही ते पुढे न्ह्यायचा होता. हिराबंबईचा काम राजाराम सर सांभाळत होते. संध्याकाळी सगळ्यांची ओळख झाली आणि कामाचे स्वरूप समजले.
हिराबंबईच्या कॅम्पखाली ५ गावे होतो परंतु आम्ही फक्त ३ जण असल्यामुळे पहिला दिवस हिराबंबईमधेच ६ वर्षाखालील मुलांची तपासणी करायचा ठरला. ७ तारखेला अजून ४ जण आल्यावर आमची ३ गावात विभागणी करायचा ठरला 

कॅम्पमध्ये सकाळी उठल्यावर आम्हाला सकाळची कामे उरकण्यासाठी २ किमी दूर असलेल्या बांधावर जावा लागायचात्यालगतचा परिसर अतिशय सुंदर होता.  
पहिल्या दिवसापासूनच पावसाची सर सुरू झाली होती. भिजतच आम्ही बांधावर पोहोचलो. त्या दिवशी आम्ही बंधाऱ्याच्या सांडव्यावर आंघोळ केली आणि परत आलो. माझ्याबरोबर संभेराव सर आणि शुभम शिंदे हे दोघे होते.

साधारण ८ पर्यंत आम्ही कॅंप वर पोहोचलो. पोहे आणि चहा घेऊन आम्ही गावात फिरायला सुरूवात केली. गावात विशेष लक्ष देण्याची गरज असलेला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र ज्या दिवशी आम्ही पोहोचलो, त्या दिवशीच ती मुलगी मरण पावल्याचं समजला. कारण तिच्या घरचे तिला दवाखान्यातून परत घेऊन आलेहे ऐकून खूप दुख झाले आणि इथल्या समस्येची थोडी झलक मिळाली.
सुरुवातीला आम्ही त्या कुपोषित मुलाच्या घरी भेट दिली आणि योग्य तो आहार दिला. तसेच त्याची इतर चौकशी केली. मुलगा कुपोषणाच्या ४ थ्या श्रेणीत होता. ५ वर्षाचा असूनही त्याचा वजन फक्त ५ कि. इतकाच होता. नंतर आम्ही १२ वाजेपर्यंत जमेल तेवढ्या घरात फिरलो आणि ६ वर्षापर्यंतच्या मुलांची विचारपूस केली आणि बरोबरच आजारी असलेल्यांना औषधे दिली. बर्‍याच मूलांना सर्दी, खोकला, ताप आणि त्वचेचे विकार यांची तक्रार होती. काही घरात त्यांचे पालक याकडे विशेष लक्ष देत नाहीयेत हे पण आढळला. दुपारी आम्ही घरी परत आलो. साधारण १२ वाजता नवीन ४ जण कॅंप वर आले त्यामुळे आता आम्ही एकूण ७ जण झालो. भेटल्यानंतर पहिल्यांदा ओळख परेड झाली
त्यातले ३ जण रत्नागिरी इंजीनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते तर एक औरंगाबादच्या कॉलेजचा    एम. बी. बी. एस. चा विद्यार्थी होता. संध्याकाळी पुन्हा एकदा गावात चक्कर मारली. नवीन आलेल्या ४ जणांना साधारण काय करायचा आहे याची माहिती दिली. थोडा वेळ फिरल्यानंतर आम्ही बंधारयावर चक्कर मारायला गेलो. तिथला एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे काही मोबाइल ऑपरेटरचा नेटवर्क येत होता. माझ्या मोबाईलला मात्र कवरेज नसल्यामुळे मी खुष होतो. संध्याकाळी सगळेजण एकत्र जमल्यावर राजाराम सरांनी हिराबंबई, भवर आणि दादरा गावासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे आमचे ३ गट केले. मी आणि प्रदीप भवरला जाणार होतो. संभेराव सर, शुभम आणि रोहन पाटील उर्फ पाटील दादरयाला तर राहुल उर्फ डॉक्टर हिराबंबईलाच थांबणार होता.  

तिसरया दिवसाची सुरुवातही बंधारयावर जाण्यापासूनच झाली. पण या वेळेस आम्ही पोहायाचा ठरवला. साधारण पाण्याचा अंदाज असल्यामुळे पोहोण्यास हरकत नव्हती. तरीही सुरूवात थोडी बिचकतच झाली. पाटील पट्टीचा पोहोणारा असल्यामुळे त्याने बाकीच्यांना धीर दिला. मग सगळ्यांनीच पाण्यात हात मारून घेतले. आज प्रदीप आणि मला भवरला जायचा होताभवरला जाताना डावल नदी ओलांडून जावे लागते. त्यामुळे पाऊस पडला तर नदी ओलांडणे धोक्याचे बनते. गाव साधारण २ किमी होते. परंतू रस्ता चढ उताराचा असल्यामुळे साधारण ४५ मि लागायचे. सकाळी नाश्ता आणि प्रार्थना केली, डबा भरला, औषधे घेतली आणि तडक निघालो.
नदीला गुडाघभार पाणी असल्यामुळे विशेष त्रास झाला नाही. शेतामधून रस्ता पार करतच आम्ही गावात पोहोचलो. पहिल्या दिवशी आम्हाला अंगणवडीच्या बाईंना भेटून ६ वर्षाखालील मुलांची आणि कुटुंबप्रमुखांची यादी बनवायची होती. त्यातच आम्हाला दुपार झाली. मग अंगणवाडीतच जेवण केले. थोड्या विश्रांतीनंतर गावात फिरायला सुरूवात केली. गाव तसा फार मोठा नव्हताएक एक करत आम्ही साधारण २५-३० घरं फिरलो आणि मुलांची माहिती घेतली.
भेटताना लोकांना स्वच्छतेचे महत्व आणि काय काळजी घ्यावी हेही सांगत होतो. औषध घेण्यासाठी काही स्वतःहून बोलवत होते. तसेच काही लोकांनी गावातल्या समस्यांसंदर्भात सभा घेण्याबद्दल सुचवले. चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव येत होते.
आमचे पहिले उद्दिष्ट होते गावातील कमी वजन असलेली मुले शोधून काढणे आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे. पहिल्या दिवशी साधारण ५ च्या सुमारास आम्ही परत जाण्यास निघालो आणि ५.४५ वाजता पोहोचलो. आल्यानंतर चहा वगैरे घेऊन दिवसभरातील गप्पांचा कार्यक्रम झाला. सगळेजण वेगवेगळया ठिकाणाचे असल्यामुळे एकमेकांची माहिती देणे घेणे चालूच होते. जवळ जवळ सगळ्यांनीच विरंगुळा म्हणून आणलेली पुस्तके उघडली. पण गप्पांचा फड जसा जसा रंगायला लागला तसा पुस्तके बाजूला सरकलीरोहन आणि प्रदीप इंजीनीरिंग कॉलेजचे असल्यामुळे तिथले किस्से सांगून त्यांनी वातावरण हास्यरंग उधळला होता. बरोबरच संभेराव सरांनी त्यांचे शिक्षकी पेशातील आणि इतर अनुभव सांगून रंग आणला. पुस्तकांबद्दलच्या गप्पाही चालू होत्या. बाकी शुभम, डॉक्टर आणि मी त्यांना साथ देतच होतो.
साधारण ८ च्या सुमारास प्रार्थना झाली आणि राजाराम सरांसोबत दिवसभर केलेल्या कामाची चर्चा झाली. पहिल्या दिवसाची एक वाईट बातमी हि होती कि आम्ही ज्या भवर गावात जात होतो तिथे २ मुलांचा वेगवेगळया कारणामुळे मृत्यू झाला होता. पण त्यांचे कुटुंब बाहेरगावी असल्यामुळे विशेष माहिती मिळाली नाही. आम्हाला त्यांची मृत्यू तारीख आणि जमला तर कारण शोधायचा होता.
नंतर सर, पाटील आणि शुभम यांनी दादरा गावातील माहिती सांगितली. गावात ३ ढाण होते आणि ते लांब लांब वसलेले होते त्यामुळे बरीच पायपीट होती. वेगवेगळया भागात वेगवेगळे लोक राहत होते. एका भागात मराठी लोक, जे रेल्वेमार्गाचा काम चालू असताना महाराष्ट्राच्या इतर भागातून आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यांच्यात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या समस्या एवढ्या तीव्र नव्हत्या. दुसऱ्या भागात कोरकू आदिवासी आणि तिसऱ्या भागात मध्य प्रदेशातून इथे आलेले हिंदी भाषिक.
या शिवाय त्यांनी गावातील शाळेलाही भेट दिली आणि शिक्षकाशी चर्चा केली.
हिराबंबई मध्ये राहुल थोरवे उर्फ डॉक्टर एकटाच होता. त्याच्यावर गावात लहान मुलांच्या भेटी घेण्याव्यतिरिक्त एका कुपोषित मुलावर लक्ष ठेवायची जवाबदारी होती. शिवाय कॅम्पवर थांबून तिथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करायचे होते.
ही सगळी चर्चा उरकल्यानंतर जेवण उरकले. रात्रीची वीज गायब झाल्यामुळे कॅन्डल लाईट डिनरचा अनुभव आला. गणपतीचे दिवस असल्यामुळे गावात उत्सव उत्साहाने साजरा केला जात होता. आम्हीही शतपावलीच्या निमित्ताने त्याची मजा लुटत होतो. रात्री उशिरा परत आल्यानंतर सगळे निद्रासीन झाले. दिवस कसा गेला हे कोणालाच समजले नाही.
            तिसरा दिवस उजाडला तोही बंधाऱ्यावरच्या पोहोण्याने. आता अधिक उत्साह होता. डॉक्टरला पोहोता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. सगळेचजण त्याला पोहोण्याचे प्रोत्साहन देत होते.
बरोबरच मीही खोल पाण्यात डुंबण्याची मजा घेतली. तसा मला पोहोता येत असले तरी मी खोल पाण्यात जायचे सहसा टाळतो. पण यावेळेस मी थोडी हिम्मत बाधून उडी टाकलीच. एकूणच नवीन नवीन अनुभव घेतच आमची सफर चालू होती. डॉक्टरनेही हळू हळू हातपाय मारायला सुरुवात केली.
बंधाऱ्याच्या तीनही बाजूने जंगलाने भरलेला डोंगर असल्यामुळे त्याचे पाण्यातले प्रतिबिंब मनमोहून टाकणारे होतेविशेषतः जेव्हा पाणी शांत होते तेव्हाचे दृश्य मनोहारी होते. एकेक क्षण नजरेत सामाहून घेण्यासारखाच होता.
सकाळचा नाष्टा आणि प्रार्थना झाल्यावर आम्ही लगेचच भवरकडे निघालो. आता रस्ता माहीत असल्यामुळे पावले झपझप चालत होती. गेल्यागेल्या आम्ही प्रथम एक न्युमोनियाची शंका असलेला मुलाला पाहून घेतले आणि त्याला औषधाचा एक डोस दिला आणि बाकी राहिलेली लहान मुलांची पाहाणी करण्यास निघालो. सोबतच आम्ही आदल्या दिवशी भेटलेल्या आजारी मुलांना भेटत होतो आणि त्यांची तब्येत तपासात होतो. दुपारपर्यंत साधारण २०-२५ घरे फिरल्यानंतर जेवण्यासाठी आम्ही एका घरात गेलो. आमच्या अगोदरचे स्वयंसेवकदेखील याच घरात जेवण करत होते असा आम्हाला कळालं.
जेवण उरकल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन आम्ही राहिलेला काम करण्यास निघालो. दीड-दोन तास फिरल्यानंतर जवळ जवळ संपूर्ण गाव फिरून झाला होता. गावात मुख्यतः साथीचे आजार होते. ताप, सर्दी, खोकला आणि त्वचेचे विकार. जास्त आजारी असलेल्या लोकांना आम्ही दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देत होतो. काही गावकरी शिक्षणाबाबतीत जागरूक होते असा दिसत होता. एक-दोघांनी तर सभा भारावून लोकांशी बोलण्याचाही विचार बोलून दाखवला. यामुळे आम्हाला चांगलाच हुरूप चढला. गावात विशेष लक्ष द्यावा असा कोणीही नव्हता. 
त्यामुळे कमी वजन असलेल्या बालकांना योग्य तो आहार मिळावा हे पाहणं गरजेचा होता. शिवाय एका वर्षाखालील मुले आजारी पडू नये म्हणून काळजी घेणा हे एक काम होता. शेवटचीच काही घरे राहिलेली असताना आम्हाला जाणवला कि ढग भरून आलेत आणि कोणत्याही क्षणी धो धो पाऊस कोसळायला सुरुवात होईल. रस्त्यामध्ये नदी असल्यामुळे आम्हाला लवकर परत येणं भाग होता. पटापट पावले उचलल्यामुळे १५ मिनिटाच आम्ही नदीपर्यंत पोहोचलो. पाऊस चालू झाला होता पण जोर वाढला नव्हता. नदीच्या पाण्यातही विशेष वाढ झाली नव्हती.
मात्र नदी ओलांडल्यावर पावसाने चांगलाच जोर पकडला. परंतू आता आम्हाला काळजी करण्याचा कारण नव्हता. साधारण ५ च्या सुमारास आम्ही घरी परतलो. दादरयावरून येणारी मंडळीही भिजतच आले. चहाची वेळ झालीच होती. बिस्किटांची तयारी करण्यात आली आणि मग दिवसभराच्या गप्पा सुरु झाल्या. एकमेकांची खिल्ली उडवत, कोणाचे पुस्तक वाचन तर कोणाची झोप चालू होती. काहीजण आपला अनुभव डायरीत उतरून काढत होते. मी पण जमेल तेवढा लिहून काढत होतो.
काही वेळाने राजाराम सर परत आल्यानंतर ८ च्या सुमारास प्रार्थना आणि कामाची चर्चा झाली.
आजही एक वाईट बातमी होती. शेजारच्याच नारदू गावातील एक मुल दगावले होते. अशा बातम्या एकूण मन खिन्न होत असे. मग याचे काय कारण असेल आणि आपण काय करायला पाहिजे याची चर्चा होणे स्वाभाविक होते.
एक गोष्ट सगळ्यांना समजली होती कि इथली मुले गोट्या खेळण्यात आणि कट्टेवाले पत्ते खेळण्यात उस्ताद होते. आम्ही सुद्धा मग ती मजा लुटायचा ठरवलं. पाटलाने पत्त्यांची तयारी तर कधीच केली होती. मग काय जेवण झाले कि थोडी भ्रमंती आणि मग पत्त्याचा डाव. आमच्यामध्ये संभेराव सर, पाटील, प्रदीप आणि मला पत्ते खेळणं माहीत होता. अर्थात खेळून बराच काळ लोटला होता. पाटील आणि प्रदीप कॉलेज मध्ये असल्यामुळे त्यांचा खेळणं होत होता. यात एक कहर हा होता कि शुभमला पत्ते खेळणं तर दूरच पण कोणता पत्ता काय आहे हे सुद्धा माहित नव्हतं. असो पण सगळेच जण काहीना काही नवीन शिकताच होते. डॉक्टरही थोडा कच्चाच होता पण त्याने लवकरच प्रगती केली आणि काही डाव शिकून घेतले. मग काय गप्पा आणि पत्ते डाव रात्री उशिरापर्यंत चालू. कधी कधी राजाराम सरसुद्धा आमच्यात सामील होत आणि खेळात रंगत आणत. मेंढीकोट किंवा दसकोट खेळताना जिंकणे हा प्रतिष्ठेचा (इज्जत) विषय होता. अर्थात हे सगळा खेळात मजा आणण्यापुरता होता. या सगळ्याचा एक फायदा होता कि दिवसभराचा थकवा विशेष जाणवत नव्हता.

चौथ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळची कामे उरकून आम्ही नऊ वाजता तयार होतो. आज डॉक्टर आमच्या बरोबर येणार होता कारण न्युमोनियाची शंका असलेल्या मुलाला तपासायचे होते. त्यामुळे मी पुढे एकता चालता झालो. प्रदीप आणि डॉक्टर मागून येणार होते. गावात पोहोचल्यावर मी राहिलेली घरे पाहून घेतली. कमी वजन असलेल्या बहुतेक मुले आम्हाला सापडली होती. विशेष काही चिंता करण्यासारखा कोणी नव्हता. तासाभराने डॉक्टर आणि प्रदीप आले आणि गावातील आम्हाला जे जास्त आजारी असलेले रुग्ण वाटले त्यांना डॉक्टरने पाहून घेतला. न्युमोनियावाल्या मुलाला १-२ दिवस औषध चालू ठेवून नंतर त्याची तब्येतीची पाहणी करायचा ठरला. दुपारचे जेवण झाल्यानंतर डॉक्टर परत निघून गेला. आम्ही आज गावातील आशा बाईंना भेटलो आणि गरोदर मातांची माहिती घेतली. तसेच ज्या मुलांची घरे आम्हाला सापडली नव्हती त्यांची घरे विचारून घेतली. त्यासुद्धा नवीनच असल्यामुळे त्यांना विशेष माहिती नव्हती. आजसुद्धा पावसाची दाट शक्यता वाटत होती म्हणून आम्ही त्यांच्याकडून छत्री घेतली आणि परत गावाकडे निघालो. आज आम्ही दोघांनीही छत्री आणि रेनकोट आणले नव्हते.
गावातून बाहेर पडताच पावसाला सुरुवात झाली. विशेष जोर नसल्यामुळे आम्ही मध्ये मध्ये थांबत पुढे जात राहिलो. ४ च्या सुमारास घरी पोहोचलो. थोड्या वेळाने सर्वजण परत आले आणि चहा गप्पा झाल्या. नेहमीप्रमाणे गोट्या खेळण्याचा कार्यक्रमही झाला.
दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जन असल्यामुळे रात्रीचे कार्यक्रम जोरात चालू होते. जेवणानंतर गणपती मंडळाच्या कार्यक्रमांची मजा लुटून आम्ही निद्रासीन झालो.
विसर्जनाचा दिवस असल्यामुळे राजाराम सरांनी आज आराम करायचा सल्ला दिला. परंतु काल आणलेली छत्री आम्हाला परत करायची होती तसेच काही रुग्णांना भेटी द्यायच्या होत्या. म्हणून सकाळी लवकर कामे आटोपून १२-१ पर्यंत परत यायचा ठरला. इतरजणही आज आमच्या बरोबर यायला तयार झाले. रोहन, प्रदीप आणि सम्भेराव सर असे आम्ही पाच जण होतो. डॉक्टर कॅम्पवरच थांबला. 
गावातला काम उरकल्यानंतर आम्ही आरामात परत यायला निघालो. आज आमच्याकडे वेळ असल्यामुळे आम्ही नदीकिनारी चक्कर मारायचा ठरवला. काही वेळ त्या निसर्गरम्य वातावरणात बसल्यानंतर कोणाचीही उठायची इच्छा नव्हती. जाताना आज वेगळ्या मार्गाने जायचा विचार केला. एक रस्ता डोंगरावर चढून नदीकडे उतरत होता. तिथून जाताना चांगलीच दमछाक झाली पण गर्द झाडीतून वाट काढताना मजा आली. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आराम करून घेतला. संध्याकाळी गोट्या खेळत असताना सर्वांना गणपतीच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले. आज चंदू सर आणि रामभाऊ पण आले होते.
कॅम्प विषयी त्यांनी माहिती घेतली आणि अडचणी जाणून घेतल्या. त्याचवेळी प्रदीप आणि मला रेहट्या गावाला भेट देण्यास सांगितले कारण तिथे एक कुपोषित मुलाला पाहायचे होते.
बराच वेळ चर्चा झाल्यानंतर ते दोघे धारणीला निघून गेले.
त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर निघालो कारण आम्हाला भवर गाव करून रेहट्यालाही जायचा होता जे भवरहून २ किमी दूर होता. प्रथम आम्ही सरळ रेहट्याला गेलो. आज ऊन जास्त असल्यामुळे खूप उकाडा होता त्यात एवढ्या लांब चालत जायचा असल्यामुळे आम्ही खूप दमलो. गावात पोहोचल्यावर आशा बाईंना भेटलो पण बातमी चांगली नव्हती तो मुलगा दगावला होता. पुन्हा तीच गोष्ट दवाखान्यात नेलेला असताना त्याच्या घरच्यांनी त्याला मधूनच परत घरी आणले. मग स्थिती गंभीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. थोड्या वेळाने आम्ही गावातील इतर मुलांची पाहणी करून घेतली.
या गावात सुद्धा थोड्या फार फरकाने तेच प्रश्न होते. आजारी रुग्णांना औषधपाणी दिल्यानंतर आम्ही भवरकडे निघालो. ऊन चांगलच तापला होता. गावात पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेतली आणि जेवण केला. गावातील आजारी लोकांची नोंद ठेवल्यामुळे त्यांना भेटी दिल्या आणि तब्येतीची विचारपूस केली.

आज सातवा दिवस. आम्हाला पुन्हा दोनही गावे पाहायची होती. ऊन तसाच तळपत होता. आज आमच्याबरोबर सर येणार होते. कालचा अनुभव असल्यामुळे आम्ही थांबत थांबतच रेहट्याला पोहोचलो.
 रुग्णांची तपासणी केल्यानंतर आम्ही भवरमध्ये परतलो. जेवण मात्र आम्ही येताना नदीकाठी केले. तिथेच काही वेळ आराम केला आणि भवरकडे निघालो. भवर गावामध्ये आम्ही एक सभा भरावयाचा विचार करत होतो परंतु आम्हाला समजले कि सभा भरावयाच्या अगोदर गावातला "चौधरी" दवंडी पिटतो आणि गावाला माहिती देतो. त्या व्यक्तीला गाठून त्याला उद्याच्या दिवसासाठी सभा होणार असल्याची दवंडी द्यायला सांगितली. त्याचबरोबर गावातील शिक्षक आणि मुख्याधापाकांची भेट घेतली आणि सभेबद्दल माहिती दिली. नंतर संध्याकाळ पर्यंत रुग्ण असलेल्या घरांना भेट देऊन गरज असेल तिथे औषधे दिली आणि परत आलो.

शेवटच्या दिवशी आमचा तोच कार्यक्रम होता भवर आणि रेहट्या गावाला भेट देऊन रुग्णांची आणि लहान मुलांची पाहणी करणे. त्याचबरोबर भवरमध्ये सभा घ्यायची होती. ४ वाजता होणार असा ठरला होता. रेहट्या वरून परत येताना जेवण झाल्यानंतर जोरदार पाऊस येणार हे काळोख दाटून आल्यावर लक्षात आला होता. भवर मध्ये परत आलो आणि गावात चौकशी केली कि सभेची दवंडी पिटली का नाही. तर लोकांना याची काहीच कल्पना नव्हती. शेवटी काही वेळ वाट पाहिल्यानंतर आम्ही निघायचा ठरवला कारण आम्हाला अहवाल तयार करायचा होता आणि पाऊस पडायची दाट शक्यता होती.
पाऊस तर सुरु झालाच होता. थांबत थांबत आम्ही परत नदीपर्यंत पोहोचलो. तोपर्यंत तर काही विशेष पाणी नव्हता. पण जसा जसा आम्ही पलीकडे जाऊ लागलो पाण्याची पातळी वाढायला लागली. आम्ही नदी पार केल्यावर लक्षात आला कि पातळी आणि पाण्याचा वेग चांगलाच वाढला होता. पुढे गेल्यावर त्याचा कारण समजला. नदीला मिळणारा एक ओढा दुथडी भरून वाहत होता. वरच्या बाजूला चांगलाच पाऊस झाला होता. ओढा ओलांडण्यात थोडा धोका होता. गावातील एक बाईसुद्धा पाणी कमी होण्याची वाट पाहत होती. काही वेळ वाट पाहिल्यानंतर प्रदीपने पलीकडे जायला सुरुवात केली. पाण्याला वेग होता त्यामुळे आम्ही हळू हळू पाय रोवत पलीकडे गेलो.
घरी पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे चहा आणि गोट्यांचा खेळ झाला. पण शेवटचा दिवस असल्यामुळे थोडी रुखरुख लागली होती. त्या अगोदर सगळ्यांनी अहवाल लिहून घेतले. आजच पुढच्या बॅच येणार होती. त्यांना आमच्या कामाचा आढावा द्यायचा होता. ते लोक साधारण ८ च्या सुमारास आले. जेवणा अगोदर ओळख करून झाली. मग आम्ही त्यांना आमच्या कामाची कल्पना दिली आणि ते पुढे काय करु शकतील याची माहिती दिली. तसेच आमच्याकडून झालेल्या काही चुकाही सांगितल्या.

नवव्या दिवशी आम्हाला हिराबंबई मधून निघायचा होता. मी चिखलदरयाला जाणार होतो. तर सर बरहाणपुरहून औरंगाबादला जाणार होते. प्रदीप आणि पाटील अकोला तर शुभम खारीला त्याच्या मित्राकडे जाणार होते. डॉक्टर आदल्या दिवशीच परत गेला होता.
धारणीपर्यंत सर आणि मी एकत्र आलो बाकी लोक अगोदरच उतरले होते. तिथेच नाष्टा केला आणि मी परतवाड्याची बस पकडली. सर बरहाणपूरला गेले. रस्ता खूप घाटांचा असल्यामुळे बसला बराच वेळ लागत होता. तसेच प्रत्येक ठिकाणी थांबल्यामुळे घटांगला पोहोचता पोहोचता मला १ वाजला. इथून मला चिखलदरासाठी जीप पकडायची होती. पण जीपला यायला १ तास लागला. तीसुद्धा खच्च भरलेली होती. शेवटी मला जीपला मागे लटकून काही किमी प्रवास करावा लागला. ३ वाजता तिथे पोहोचल्यानंतर माझ्या ओळखीचे राजेश घागरे यांना फोन लावला परंतु ते बाहेर गेल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.
खूप भूक लागलेली असल्यामुळे जेऊन घेतला आणि मग राहायची व्यवस्था शोधू लागलो. चौकाच्या बाजूलाच पुंडलिक भवन मध्ये राहायची सोय केली. चौकशी केल्यानंतर त्याच्या मालकांनी सुचवला किमी आज आराम करून उद्या चिखलदरा पाहून दुपारी अमरावतीसाठी निघू शकतो. मला पण आरामाची खूप गरज होती. संध्याकाळ पूर्ण आरामात काढली आणि रात्रीचा जेवण करून झोपी गेलो.

सकाळी लवकर उठून आवरला आणि चौक गाठला तिथेच चिखलदरा फिरण्यासाठी गाडी बघितली ३५० मध्ये तो तयार झाला आणि चिखलदरामधील ५-६ प्रसिद्ध ठिकाणे पाहून घेतली. विशेष काही वेगळा वाटला नाही. मात्र या निमित्ताने महाबळेश्वरची आठवण झाली.
 फिरताना विचार आला वेळ आहेच तर सेमाडोहला जाऊन येऊ. या महिन्यात सफारी चालू नसली तरी आजूबाजूचा परिसर पाहून यावा म्हटला आणि १००० रुपयात गाडीवाला तयार झाला. इतक्या दूर आलोच आहे तर पाहून घ्यावा असा विचार करून निघालो. चिखलदरा सोडल्यानंतरचा परिसर खुपच घनदाट होता. प्राणी दिसण्याची अशा नसली तरी आजूबाजूला पाहूनच मन सुखावून गेला. सेमाडोहचा परिसरही निसर्गरम्य होता. सफारी घेता येणार नाही याची मनाला हुरहूर मात्र होती.
तसाच पुढे आम्ही कोल्काज या ठिकानी गेलो. इथे सरकारी अधीकाऱ्यांची राहायची व्यवस्था आहे. ७० च्या दशकात इंदिरा गांधी इथे राहिल्यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहे.
सिपना नदी बाजूनेच वाहत असल्यामुळे हे ठिकाण एकदमच मस्त वाटले.
आता परतीच्या वाटेची वेळ आली होती. सेमाडोहला परत येऊन मी परतवाड्याची वाट धरली. तिथून अमरावती मार्गे बडनेरा गाठला.
एका वेगळ्याच जगात राहिल्याचा अनुभव होता. १० दिवसात मनाची शांती अनुभवली. बाहेरच्या जगाशी संपर्क नसणे कधी कधी गरजेचा असता हे मात्र पटलं.